Thursday 29 January 2015

MNS, BJP, Shiv Sena : राज ठाकरेंनी विचार करावा


शिवसेनेत आपली गळचेपी होते आहे. या भावनेने राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले. ' महाराष्ट्र नवनिर्माण सेना ' नावाचा नवा पक्ष स्थापन केला. शेवटी ' सेना ' च का ? 
तर जे कोणी राज ठाकरेंच्या बरोबर शिवसेनेतून बाहेर पडले त्यांना मानसिक समाधान मिळेल. सुरवातीच्या दोन चार निवडणुकात त्यांनी मोठा यश मिळवलं. अगदी शिवसेनेला शह बसेल असं. नाशिक महानगर पालिकेची सत्ता सुद्धा मिळवली. पण २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाचं आणि कार्यकर्त्यांच मानसिक खच्चीकरण झालं. त्यांनतर पक्षात जे चैतन्य फुंकायला हवं होतं ते त्यांना फुंकता आलं नाही. पक्ष संघटनेकडे त्यांनी लक्ष दिलं नाही. 


राज ठाकरेंनी पक्ष संघटनेकडे लक्ष दिलं नाही म्हणण्यापेक्षा आधीच्या यशामुळे पक्ष संघटना आहेच अशी त्यांची समजूत झाली होती. आणि स्वतःच्या कर्तुत्वावर त्यांचा नको इतका विश्वास होता. आपण एकहाती चक्र फिरवु शकतो अशी त्यांना खात्री होती. आपली भाषणं आणि आपला खळ SSSS खट्याक ' नारा हिच सत्तेची किल्ली आहे असा त्यांचा समज होता. पण विश्वास आणि वास्तव यातला फरक त्यांच्या अजुनही लक्षात आलेला नाही. 

म्हणुनच महाराष्ट्रातल्या नद्यांच पाणी गुजरातला वळवणार या कुणीतरी पेरलेल्या बातमीचं ते राजकारण करू पहाताहेत. मुळात मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार, मध्य रेल्वेचं कार्यालय गुजरातला हलवणार, अशा कितीतरी बातम्या आजवर पेरल्या गेल्या. आणि नंतर सुरेश प्रभू आणि स्वतः मुख्यमंत्री तसेच नरेंद्र मोदींनी तसं काही होणार नसल्याचं स्पष्ट केल्यावर त्या बातम्यांना पुर्ण विराम मिळाला. 

अशा बातम्या पेरणं हे विरोधकांच कामच असतं. बातम्या कशा पेरल्या जातात याचं आणखी एक उदाहरण देतो. साखर कारखाने सुरु झाले. महिना झाला. शेतकऱ्यांचे उस तुटत होते कारखान्याला जात होते. ऊसाच्या बाजारभावाविषयी उलटसुलट बातम्या येत होत्या. क़िति भाव मिळणार ? हे निश्चित नव्हतं. अशात ऊसाला केवळ चौदाशे ते पंधराशे भाव मिळणार अशी बातमी फुटली. मिडीयावर ती फारशी झळकली नाही. पण या बातमीची चर्चा प्रत्येक शेतकऱ्याच्या तोंडी होती. 

अशा बातम्यांनी सामान्य माणसानं विचलित होणं सहाजिक आहे. पण ' महाराष्ट्रातल्या नद्यांच पाणी गुजरातला वळवणार ' या बातमीचं राजकारण करण्या इतकी ती बाब गंभीर आहे का ? राज ठाकरेंनी त्या बातमीची पडताळणी केली आहे का ? तसे घडणार असल्या संदर्भातले काही पुरावे गोळा केले आहेत का ? काही नाही. आपण चर्चेत रहाणं गरजेचं आहे याची राज ठाकरेंना जाणीव आहे. म्हणुनच ते विषय शोधत होते. पण त्या विषयाची काय खातरजमा करून घेतली आहे ? काही नाही.

वास्तव आहे ते असं मनसे अस्त पावत चालली आहे. अशी विधानं करून तिच्यात प्राण फुंकणे शक्य नाही. हे त्यांनी लक्षात घ्यायला हवे. त्यामुळेच अशी काही विधानं करत बसण्यापेक्षा आणि बिनबुडाच्या बातम्यांचं राजकारण करत बसण्यापेक्षा राज ठाकरेंनी मनसे शिवसेनेत विलीन करून टाकावी आणि उद्धव ठाकरेंचे हात बळकट करावेत. 


पण राज ठाकरे असा निर्णय सहजासहजी घेणार नाहीत. उद्धव ठाकरे आणि त्यांचं अष्टप्रधान मंडळ सुद्धा त्यांना सहज जवळ करणार नाहीत. किंबहुना उद्धव ठाकरे आपल्याला जवळ करणार नाहीत. याची राज  ठाकरेंनाही जाणीव आहे. मान खाली घालुन कुणाला शरण जाण्याचा राज ठाकरेंचा स्वभाव नाही. त्यामुळेच टोल असो वा  महाराष्ट्रातल्या नद्यांचं पाणी, हे सुत हाताशी धरून ते राजकीय पटलावर मान वर काढण्याचा प्रयत्न करताहेत. पण असं करताकरता त्यांची पुरती दमछाक होणार आहे. उरल्या सुरल्या सन्मानाची माती होणार आहे. त्यामुळेच जी समय शुचकता वसंत गीते आणि दरेकरांनी दाखवली ती राज ठाकरेंनी दाखवायला हवी. आणखी वाताहात होण्या आधीच शिवसेना जवळ करणार नसेल तरे सरळ भाजपात सामील व्हायला हवं. कारण असा निर्णय घेतला तर राज ठाकरेंची मान ताठ राहिलंच पण उद्धव ठाकरेंनाही शह देता येईल.


भाजपातच नव्हे तर त्यांनी राष्ट्रवादीतसुद्धा सामील व्हायला हरकत नाही. पण स्वतःचा मान आणि प्रतिष्ठा सांभाळून.

पण अशी कोणतीच भूमिका न घेता राज ठाकरे असं बिनबुडाचं राजकारण करत राहिले त्यांची अवस्था लवकरच वादी नसलेल्या चाबकासारखी होईल. कितीही मारला तरी त्याने वळही उठणार नाहीत आणि जरबही बसणार नाही.     

                        
         
           

6 comments:

  1. lekh chhan ch jhallay. Pan 2 typo errors ahet.

    ReplyDelete
    Replies
    1. आभार मित्रा. लिहिण्याच्या चुका विचारांच्या ओघात होतात. टाळण्याचा प्रयत्न करीन.

      Delete
  2. अमज and २१०४. Baki as usual apratim lekh.

    ReplyDelete
    Replies
    1. आभार मित्रा. दोन्ही आणि आणखी काही चुका दुरूस्त केल्या आहेत. लिहिण्याच्या ओघात होणाऱ्या अशा चुका टाळण्याचा प्रयत्न करीन.

      Delete